‘सारथी हेल्पलाईन’ च्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांची ‘रिंग’?
अधिकारी गाफील; मलिदा लाटण्यासाठी ठेकेदारांची मैफील
आयुक्त श्रावण हर्डिकर ‘पारदर्शी’ लक्ष घालणार काय?
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडकरांना सोशल मीडियाद्वारे महापालिका प्रशासनाशी ‘कनेक्ट’ होता यावे. याकरिता प्रशासनाने सारथी हेल्पलाईन, कॉल सेंटर असे महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. त्याचे शहरातील नागरिकांनी स्वागतही केले आहे. पण, या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात काही ठेकेदार ‘रिंग’ करुन मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
परिणामी, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा कारभार हाकणारे आयुक्त श्रावण हर्डिकर या निविदा प्रक्रियेमध्ये ‘पारदर्शी’पणे लक्ष घालतील काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये दिमाख कन्सलटन्ट प्रा. लि., मोनार्क टेक्नॉलॉजीस पुणे प्रा, लि., टेक 9 सर्विसेस या कंपन्यांकडून निविदा भरण्यात आली आहे. पण, ठेकेदारांच्या रिंग करण्यामुळे सामान्य आणि प्रामाणिक ठेकेदारांवर अन्याय होत असल्याची शंका उपस्थित होत आहे.
महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अवैधरित्या उपयोग केला जात असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
टेक 9- सर्व्हिसेसलाच काम मिळणार?
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेतील या सर्व प्रकारामुळे महापालिकेची निविदा प्रक्रिया कधीतरी सुरळीत होणार का? असा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिक आयुक्तांना विचारत आहेत. टेक 9 सर्विसेस हा ठेकेदार आय टी डिपार्टमेंटमध्ये हे रिंग करून काम करतो आणि ‘स्मार्ट सारथी’चे सुद्धा त्याने रिंग केली असून, हे काम टेक 9- सर्व्हिसेस या ठेकेदारालाच मिळणार आहे, असे संबंधित विभागातील विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू असताना एकाद्या विशिष्ट ठेकेदारालाच काम मिळणार, अशी चर्चा होणे हे महापालिकेच्या ‘पारदर्शी’ कारभारला शोभणारे नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.