सांगवीतील गॅस शवदाहिनी जनरेटरविना ‘वंचित’; मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार!
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने जुनी सांगवी येथे गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून ही शवदाहिनी विविध कारणांनी चर्चेत आहे. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असता, जनरेटर सुविधा आहे. मात्र, दोन जनरेटर असतानाही कायम बंद किंवा नादुरूस्त असतात. त्यामुळे भाड्याने जनरेटर आणून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राजु सावळे यांनी प्राशासनाच्या कारभारावर आरोप केले आहेत.
जुनी सांगवीच्या गॅस शवदाहिनी बद्दल गेली १२ वर्षे पिं.चिं.मनपाचा भोंगळ कारभार चालू आहे. मनसेचा पाठपुरावा व अनेक संघर्ष करून पर्यावरण करीता मग १२ वर्षांपूर्वी सांगवीला लाभलेल्या या शवदहिनीचा जनरेटर काही करा चालू होत नाही. दोन जनरेटर नादुरूस्त असून केवळ दाखवण्यासाठी राहिले आहेत.
यावर उपाय म्हणून प्रशासन भाड्याने जनरेटर उपलब्ध करते. त्याद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये कोणाचे हित दडले आहे, असा सवालही सावळे यांनी उपस्थित केला आहे.
वेळोवेळी अधिकाऱ्यांना फोन करून लाईट नाहीये म्हणून जनरेटर उपलब्ध करा असे सांगून अंत्यसंस्कार करून घेतले जातात. दोन दिवसांपूर्वी हद्दच झाली सांगवी, दापोडी व नवी सांगवी येथील ३ मृतदेह जनरेटर अभावी कसे अंत्यसंस्कार करावे असा प्रश्न होता… फोन केल्यावर जनरेटर आला व त्यानंतर मृतदेहांचे अतंविधी करून घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा मनसेने निषेध केला आहे. अन्यथा मनसे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राजू सावळे यांनी दिला आहे.