सहायक आयुक्त पदावर पदोन्नती द्या, संभाजी ऐवले यांची प्रशासनाकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/pcmc-2.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे केली आहे. पदोन्नतीचा ठराव महासभेत मंजूर झालेला असताना सुध्दा पालिका प्रशासन ऐवले यांना पदोन्नती देण्यास उदासिन दिसते. सहा महिन्यात ते निवृत्त होत आहेत. तरी देखील त्यांना पदोन्नतीस डावलले जात आहे. राजकीय अनास्थेपोटी हे घडत असून आयुक्तांसह प्रशासन अधिकारी हातबल झाल्यामुळे नियमानुसार पात्र ठरणारे ऐवले यांना अन्याय सहन करावा लागत आहे.
राज्य सरकारच्या14 नोव्हेंबर 2017 च्या आदेशानुसार प्रत्येक महापालिकांना दिव्यांग कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी उपायुक्तावर सोपविणे बंधनकारक आहे. यानुसार नागरवस्ती विकास योजना विभागासाठी १०४ घटक निहाय योजनांची समक्षपणे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुर्णवळ सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी ऐवले यांनी केली आहे. दरम्यान, सहायक आयुक्त ऐवले यांच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कक्षाची निर्मिती करून त्यावर स्वतंत्र अधिकारी नेणून त्यांना वित्तीय अधिकार प्रदान करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनच्या वतीने करण्यात आली होती.
आवश्य वाचा – अधिकारी संभाजी ऐवले यांचे महिला व बालकल्याणचे अधिकार काढले, झगडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
संभाजी ऐवले या विभागाच्या समाजविकास अधिकारी पदावर 2014 पासून कार्यरत आहेत. त्यांची 21 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. महापालिका सेवेते त्यांनी 33 वर्ष सेवा केली आहे. पुढील सहा महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता आणि सेवानिवृत्ती दिनांक 21 मे 2021 या सर्व बाबींचा विचार करता ते सहायक आयुक्त पदासाठी पात्र ठरतात. सध्याचे समाजविकास अधिकारी हे पद त्यांचे प्रशासन अधिकारी समकक्ष पद आहे. त्यांना तत्सम निर्धारित वेतनश्रेणीच्या सहायक आयुक्त पदावर नियुक्ती मिळू शकते. मात्र, पालिका प्रशासन त्यांना पदोन्नती देण्यास उदासिन असल्याचे चित्र आहे.
आवश्य वाचा – ‘नियुक्ती आदेश निरस्त करा’, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांचे आयुक्तांना पत्र
त्यावर ऐवले यांनी आता पुन्हा नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहायक आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी प्रशासन अधिकारी लोणकर यांच्याकडे केली आहे.
शासनाचे अधिकारी केवळ स्वाक्षरीचे मानकरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध घटकातील सुमारे 25 लाख लोकांच्या कल्याणासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले हाताळतात. मात्र, प्रशासनाने त्यांना स्वाक्षरीच्या फे-यात लटकवण्यासाठी या विभागाच्या सहायक आयुक्त पदावर आजपर्यंत शासकीय अधिका-यांची नेमणूक केली. यापूर्वीचे सहायक आयुक्त हे शासनाद्वारे आलेले होते. शासनाकडून आलेले अधिकारी केवळ स्वाक्षरीचे मानकरी ठरले आहेत. प्रत्यक्षात काम कारताना मात्र, ऐवले यांनाच पुढाकार घ्यावा लागतो. सहायक आयुक्त दर्जाचे काम ऐवले यांना करावे लागत असेल तर शासन आदेशानुसार त्यांना सहायक आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात यावी, असा ठराव पूर्वी महासभेने मंजूर केलेला आहे. मात्र, आजही त्या ठरावानुसार ऐवले यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही.