सर्वपक्षीय नेते प्रचारात दंग, सोलापूर, सांगली आणि साता-यात दुष्काळांच्या झळांनी जनता त्रस्त
- पाणी, जनावरांना चा-यांची सोय कधी?
- सोलापूरात सव्वा तीन लाख लोक दुष्काळाने बाधित
पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील भागात दुष्काळाने जनता त्रस्त झाली आहे. मात्र, राज्यातील नेते मंडळी सर्वत्र मताचा जोगवा मागत फिरत आहे. त्यांनी दुष्काळ झळाकडे दुर्लक्ष करुन जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि हाताला काम मिळत नसल्याने जनतेतून सर्वपक्षाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
पुणे विभागात ११ लाख २ हजार जनता दुष्काळाने बाधित झाली असून १ लाख ३८ हजार ७३७ पशुधनास चारा मिळत नसल्याने दुष्काळाने बाधित झाले आहे. तसेच संपुर्ण पुणे विभागात पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ६०० टॅंकरने सोय केली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे साताऱ्यात १५१, सांगलीत १६२, तर सोलापूरात १७७ टँकर सुरू आहेत. परंतू, मे आणि जूनमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे.
सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. तर सांगली जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ४८९ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. तर साता-यातील बाधितांची संख्या २ लाख ३८ हजार १५१ वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ४२५ नागरिकांना दुष्काळामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुणे विभागात दुष्काळाने ५२१ गावे आणि 3 हजार ४७७ वाड्या बाधित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील टँकरने शंभरी ओलांडली असून जिल्ह्यात सध्या १०७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ९५ टँकरने सुरू असून सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात ९१ टँकर सुरू आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सध्या मंगळवेढ्यातील नागरिकांना ५१ तर सांगोल्यातील नागरिकांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
तालुका निहाय टँकरची आकडेवारी –
सोलापूर – सांगोला ३१, मंगळवेढा ५१, माढा १०, करमाळा २६, माळशिरस ८, मोहोळ ४, दक्षिण सोलापूर १७, उत्तर सोलापूर ९, अक्कलकोट ४ व बार्शी ५.
पुणे – आंबेगाव ११, बारामती २६, दौंड ११, हवेली ३, इंदापूर २, जुन्नर ९, खेड ५, पुरंदर १२, शिरूर २१ व वेल्हा १.
सातारा – माण ९१, खटाव २२, कोरेगाव २५, फलटण १०, वाई ५, खंडाळा १, पाटण १
सांगली – जत ९५, कवठेमहाकाळ १०, तासगाव ८, खानापूर १४, आटपाडी २९.