समाधान : शहरातील 95.65 टक्के रुग्णांची कोरोनावर मात
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाने 85 हजारांचा आकडा ओलांडला असला तरी सद्यस्थितीत एकूण रुग्णांच्या अवघे 2.60 टक्के रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत 95.65 टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. गेल्या पंधऱा दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. तसेच, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
शहरामध्ये आज 201 रुग्णांची भर पडली. तर 334 रुग्णांना रुग्णालयातून घऱी सोडण्यात आले. आतापर्यंत 82 हजार 118 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 95.65 टक्के इतके आहे. तर, सद्यस्थितीत अवघे 2.60 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात अवघे 1 हजार 461 रुग्ण असून त्यापैकी 297 रुग्ण शहराबाहेरील आहेत.
मंगळवारी चार वाजेपर्यंत शहरातील 193 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 8 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 1758 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 297 रुग्णांचाही समावेश आहे.
मंगळवारी दिवसभरात 334 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 82,118 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2115 संशयित रुग्ण तपासणीसाठी आले होते. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 939 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.