सत्तारुढ पक्षनेत्यांची ‘कोविड’ रुग्णालयास दिली अचानक भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/FB_IMG_1600069269548.jpg)
रुग्णांची विचारपूस करुन डाॅक्टरांकडून जाणून घेतल्या समस्या
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवगृह, मगर स्टेडिअम येथील जम्बो कोविड रुग्णालय व महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोविड 19 हॉस्पिटलबाबत तक्रारी आल्यामुळे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी तिन्ही ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली. तसेच, रुग्णांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस करून रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या.
वायसीएम रुग्णालयातील शवगृह 22 दिवसांपासून बंद असल्याबाबत तक्रारी येऊ लागल्या होत्या. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ढाके यांनी थेट शवगृहांची पाहणी केली. तसेच, संबंधित डॉक्टराकडून तक्रारींबाबत माहिती जाणून घेत रजिस्टरमधील नोंदीची तपासणी केली. यावेळी, शवगृह बंद नसून चालू असल्याबाबतची खात्री करून घेतली. तसेच, वायसीएम रुग्णालयासाठी नव्याने परवानगी मिळालेल्या 20 केएल ऑक्सीजन टँकची देखील पाहणी त्यांनी केली. त्याचबरोबर,
राज्य शासनाच्या वतीने मगर स्टेडिअम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात शहरातील रुग्ण भरती न करणे, दाखल असलेल्या रुग्णांची अपडेट नातेवाईकांना न मिळणे अशा तक्रारी येऊ लागल्याने याठिकाणी देखील डॉक्टर व व्यवस्थापनासोबत चर्चा करून रुग्ण व नातेवाईकांशी समन्वय साधण्यासाठी योग्य नियोजन करावे. सद्धस्थितीत जम्बो रुग्णालयात 30 व्हेंटिलेटर, एचडीयु 22, ऑक्सीजन 407 बेड कार्यान्वित आहेत, तरी पुढील चार ते पाच दिवसात पूर्णपणे बेड उपलब्ध करून द्यावेत, या बाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोविड 19 हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी, वॉर रूममधून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी कशाप्रकारे संवाद साधला जातो, याची प्रत्येक्ष माहिती घेतली. तसेच, स्वतः वॉर रूम मधून रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्याचबरोबर ऑक्सीजन बेड वरील रुग्णांनी लवकरच बरे होऊन पुढील आयुष्य आपल्या कुटुंबासोबत निरोगी जगावे, अशा मोरया शुभेच्छा दिल्या.