सत्ताधा-यासह विरोधी नगरसेवकांचा दबाव; आयुक्तांची सपशेल माघार
![सत्ताधा-यासह विरोधी नगरसेवकांचा दबाव; आयुक्तांची सपशेल माघार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-7.jpg)
स्थापत्यच्या 25 उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्याच्या बदली आदेशाला स्थगिती
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील स्थापत्य विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या 5 उपअभियंता आणि 20 कनिष्ठ अभियंत्याची बारा दिवसापुर्वी बदल्या करण्यात आल्या. मात्र, सत्ताधा-यासह विरोधी नगरसेवकांच्या राजकीय दबावापुढे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी माघार घेत उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याच्या बदली आदेशाला आज (बुधवारी) तीन महिने स्थगिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात ७ वर्षांपासून अधिक काळ असलेल्यांची माहिती प्रशासनाने मागविली होती. त्यामध्ये 25 विभागामध्ये एकूण 1200 हून अधिक अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम असल्याचे प्रशासनास दिसून आले. त्यानूसार उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक यांसारख्या अन्य पदांवर देखील अनेक वर्षे ठाण मांडून खुर्ची उबविणारे अधिकारी, कर्मचारी आढळून आले.
त्यानूसार महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी राजकीय नेत्यांसह पालिका पदाधिका-यांचा दबाव झुगारुन अनेकांच्या बदल्या डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आल्या. तसेच काही अधिकारी व कर्मचा-यांना पदोन्नती देखील देण्यात आली. परंतू, स्थापत्य विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याच्या तत्काळ बदल्या रद्द कराव्यात, याकरिता सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह आमदारांचा देखील आयुक्तांकडे तक्रारी येवून राजकीय दबाव वाढू लागला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी 25 उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याचा 24 डिसेंबर 2020 रोजी केलेला बदली आदेशाला 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती आदेश दिला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/7.jpg)
आयुक्त हर्डिकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्थापत्य विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता संवर्गातील अधिकारी व कर्मचारी 24 डिसेंबर 2020 च्या आदेशाने केलेले स्थानांतरण प्रशासकीय कारणास्तव 31 मार्च 2021 अखेर स्थगिती देत आहोत. संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी स्थानांतरणाचे पुर्व विभागात तात्काळ रुजू होवू कामकाज करावे, असंही म्हटलं आहे.