संभाजी ऐवले यांच्या सहायक आयुक्त पदाचा पदोन्नती आदेश तत्काळ काढावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pcmc-14.jpg)
- आमदार अण्णा बनसोडे यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली होती. महासभेच्या मंजूर ठराव क्रमांक 713 व 499 मध्ये समाविष्ठ सहायक आयुक्त पदाचा पदोन्नती आदेश काढण्यात यावा, अशी सूचना त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर सहायक आयुक्त या अभिनामाची गट अ मधील 11 पदे मंजूर आहेत. या पदावर पदोन्नतीने महापालिका अधिका-यांमधून 50 टक्के व प्रतिनियुक्तीने 50 टक्के पदे भरण्यात यावीत, असे शासनाच्या सेवाप्रवेश नियमावलीमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. पालिका अधिका-यांसाठीच्या पाच पदांपैकी तीन पदांवर अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली. उर्वरित दोन पदे अद्याप रिक्त आहेत. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी पालिका अधिका-यांमधून पदोन्नतीने नेमणूक देणे अत्यांत आवश्यक आहे, असे आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना सूचित केले होते.
महासभा ठराव क्रमांक 913 दिनांक 29/08/2016 आणि ठराव 499 दिनांक 20/01/2020) नुसार संभाजी ऐवले हे गट ब मधील समाजविकास अधिकारी या पदावर सध्या कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नतीने सहायक आयुक्त या गट अ मधील पदावर नेमणूक देणेबाबत ठरावामध्ये नमूद आहे. त्याला महासभेने मान्यता देखील दिली आहे. त्याची जाणिपूर्वक अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसून येत असल्याचे आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे. समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांना विनाविलंब पदोन्नतीद्वारे सहायक आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात यावी. त्यांचा प्रशासकीय अनुभव व शैक्षणिक अर्हता विचारात घेता त्यांच्याकडे नागरवस्ती विकास योजना विभागाकडील सर्व कल्याणकारी योजनांचे कामकाज देण्याबाबत तसा आदेश काढण्यात यावा, अशी सूचना आमदार बनसोडे यांनी निवेदनात केली आहे.