‘श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाचा’ आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांची बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/2-3.jpg)
वडगाव मावळ । वडगाव मावळ येथे पंचायत समिती सभागृहात ‘श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाचा’ आढावा घेणे संदर्भात मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
रुरबन अभियान अंतर्गत मावळ तालुक्यातील कान्हे, कामशेत, कुसगाव, चिखलसे, जांभूळ, साते या गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. या अभियानाअंतर्गत निवडलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण नियोजनबद्ध विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. परंतु प्रशासन स्तरावर मागील काही वर्षात प्रारूप आराखडा तयार असुनही त्याचा पाठपुरावा झालेला दिसत नाही. सदर अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला.
‘पायाभूत सुविधांसाठी असलेल्या निधीचा योग्य विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. कुठलीही विकास कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सहभाग असणे, त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. या बैठकीत सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींशी प्रलंबित कामे, समस्या तसेच पुढील नियोजन यावर चर्चा झाली असे आमदार शेळके यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी वाजे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग अधिकारी, सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.