शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ‘सोमवारी मंत्रालया’समोर आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/20180918_143630.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमीभाव न देणारे व्यापारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सोमवारी (ता. 24) मंत्रालयासमोर निषेध आंदोलन करण्याचा इशारा छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या वेळी छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब फुगे, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता लांडे, शहराध्यक्ष राज गोदमगावे, शरद पाटील, योगिता भागणे, गौरव धनवे, सूरज ठाकर, राजू पवार, उपाध्यक्षा सुनीता फुले, महिला उपाध्यक्षा मनीषा जाधव, संपर्क प्रमुख स्वाती भोई उपस्थित होते.
येळकर-पाटील म्हणाले, “”बाजार समिती किंवा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालास निर्धारित हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, ते आत्महत्या करत आहेत. शेतमालासंदर्भात हमीभावाच्या कायद्याचे राजरोसपणे उल्लंघन केले जाते. 21 ऑगस्ट 2018 रोजी राज्य सरकारने शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणारे सर्व व्यापारी तसेच बाजार समितीवर पन्नास हजार रुपये दंड व एक वर्षाचा कारावास, परवाना रद्द करण्याची घोषणा केली. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतमालाला हमीभाव न देणारे व्यापारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. सरकारने खरेदी केंद्र सुरू करावीत. शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल खरेदी करावा व त्याची रक्कम बॅंक खात्यात दोन दिवसांत जमा करावी. 2017 -18मधील खरेदी केलेल्या तूर, हरभरा यांची रक्कम अद्याप जमा झाली नाही. मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने पिके करपली. त्यांचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी मंत्रालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. नंतर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सर्व मंत्र्यांच्या घरासमोर प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात येईल.”
…..