शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडून सुप्रिया’ताईं’चे ब्रॅंडिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/123-2.jpg)
- निमित्त वाढदिवसाचे…
- संसदरत्न सुप्रिया सुळेंवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव
पिंपरी – संसदरत्न पुरस्कार मिळवून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील शहर पातळीवरील राजकीय चर्चेत स्थान मिळविले आहे. शिवसेना खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांनी सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळवून विक्रम केल्याचे फ्लेक्स पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले होते. मात्र, बारणे यांच्या प्रसिध्दीझोताला छेद देण्यासाठी राष्ट्रवादीने सुप्रियाताई यांच्या संसदरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला आहे. फ्लेक्स, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामद्वारे सुप्रियाताईंना कार्यकर्ते शुभेच्छा देताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई यांचा आज शनिवारी (दि. 30) वाढदिवस आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. तसेच, संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सुप्रियाताई जरी उपस्थित नसल्या तरी कार्यकर्त्यांनी मात्र, हा आनंदोत्सव मोठ्या थाटात साजरा केला आहे. तसेच, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंन्स्टाग्राम या समाजमाध्यमांद्वारे ताईंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच, पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरात शुभेच्छांचे फलकही झळकले होते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार आप्पा बारणे हे संसदरत्न पुरस्कार पटकविणारे केवळ एकमेव खासदार नसून राष्ट्रवादीच्या खासदार ताईंचा देखील त्यामध्ये अग्रगन्य स्थानावर आहेत, असाच संदेश राष्ट्रवादीने समाजमाध्यमांद्वारे दिला आहे.
मावळचे खासदार आप्पा बारणे यांना सलग चौथ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक ते खासदार होऊन अशी कामगिरी करणारे ते पहिले खासदार ठरले आहेत. लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, उपस्थिती आणि खासदार निधीचा वापर या कामगिरीबद्दल बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने सलग चवथ्या वर्षी “संसद रत्न” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर शहरात फ्लेक्स लावून बारणे यांनी मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळवली. त्याला छेद देण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही सुप्रियाताईंना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे शिवसेनेचेच खासदार संसदरत्न मिळवू शकतात हे दाखविण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीने ताईंचे ब्रॅंडीग सुरू केल्याचे चित्र या अघोषित स्पर्धेतून समोर येत आहे.