शिलाई मशीन खरेदीची जीएसटी पावती सादर करण्यास मुदतवाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/img_4657.jpg)
- पक्षनेता एकनाथ पवार, महिला बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांची माहिती
पिंपरी – महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय देण्यात येते. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना मशीन खरेदी केल्याची जीएसटीची पावती आणि बॅंक खात्याचा तपशील माहिती केंद्रात सादर करण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. तरी, पात्र लाभार्थ्यांनी मुदतीत पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन पक्षनेता एकनाथ पवार आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागअंतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीस सक्षम बनविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. उद्योग क्षेत्रात आर्थिक हातभार म्हणून पालिकेच्या वतीने महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावर पालिकेकडे 13 हजार 182 अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातील 9 हजार 527 अर्ज पात्र ठरले. तर, 3 हजार 655 अर्ज अपात्र ठरले. पात्र लाभार्थ्यांपैकी 6 हजार 872 लाभार्थ्यांना नागरवस्ती विभागाद्वारे एसएमएस पाठविण्यात आला आहे. उर्वरीत 2 हजार 655 लाभार्थ्यांना दुस-या टप्प्यात एसएमएस पाठविला जाणार आहे, अशी माहिती समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
शिलाई मशिनचे आर्थिक सहाय घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना मशिन खरेदी केल्याची जीएसटीची पावती आणि बॅंक खात्याचा तपशील सादर करण्यासाठी 31 जुलै मुदत दिली होती. त्यावर 3 हजार 400 लाभार्थ्यांनी मशीन खरेदी केल्याची जीएसटी पावती सादर केली. काही अर्जदारांना ही पावती आणि बॅंक खात्याचा तपशील सादर करणे शक्य झाले नाही. नागरिकांना अडचण निर्माण झाल्याने त्यांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी जीएसटीची पावती आणि बॅंकेचा तपशील सादर करण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली. त्यावर ही मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पक्षनेते पवार आणि सभापती म्हेत्रे यांनी सांगितली.