शिरुरमध्ये निष्ठावंतांची उपेक्षा, उप-यांना संधी दिल्याने कार्यकर्ते नाराज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/2kolhe_lande_ff-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (शुक्रवारी) दुसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर लोकसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उप-या, आयात उमेदवारांना उमेदवारी दिली. त्यामुळे भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडेचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी ‘आता आपला पक्ष अपक्ष’ अशा पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करुन लढत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा येतात. त्यातील 10 जागा काल, तर 5 जागा जाहीर करण्यात आल्या. विशेष म्हणजे, मावळमधून नातू पार्थ पवार यांची उमेदवारी स्वत: शरद पवार यांनीच जाहीर केली. तसेच, दुसऱ्या यादीत शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरुरमधून विलास लांडे यांचा पत्ता कट झाला आहे.
मागील दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांना काम करण्यास सांगितलं आणि त्यानंतर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात केली. पण अचानक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अमोल कोल्हे यांचे नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार थंड पडल्याचं चित्र शिरूर मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे.
अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून लोकप्रिय झाले. त्यांची लोकप्रियता लक्षात घेत विलास लांडे यांनी केलेल्या प्रचारात कोल्हे विजय होतील, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. पण उमेदवारीवरुन आता नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. तसेच नाराज विलास लांडे व त्याचे समर्थक काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.