शासनाने दरवर्षी ‘छत्रपती संभाजी महाराजांची जयंती’ साजरी करावी, मुख्यमंत्र्यांना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/tv07.jpg)
- पिंपरी चिंचवडचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्र राज्य शासन वर्षेभर विविध महापुरुषांची जयंती साजरी करीत असते. पण अखंड महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य आणि कर्तव्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी त्यांची जयंती साजरी करावी, तसेच प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने “छत्रपती संभाजी महाराज” यांची जयंतीदिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, याबाबत तातडीने अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी केली.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, राज्यभरातील युवकांच्या भावना लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने “छत्रपती संभाजी महाराज” यांची जयंती साजरी करावी, संभाजी महाराजाच्या जयंतीदिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी. त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या तात्काळ अध्यादेश काढण्यात यावा. अशी मागणी केली.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवडच्या संभाजीनगर बर्ड व्हॅली उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिलेले नाही. पुतळा उभारल्यापासून त्याची देखभाल केलेली नाही. तरी या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे, पुढील वर्षापासून 14 मे रोजी जयंती उत्सव साजरा करावा, अशीही मागणी नगरसेवक तुषार हिंगे यांनी केली आहे.