शहरात डास निर्मुलनासाठी विशेष मोहीम आखणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Dengue-file-photo_0.jpg)
पिंपरी – शहरात डासांचा प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. याकरिता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शहरात डास निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. हा निर्णय महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात सोमवारी (दि.21) घेण्यात आला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, एसटी वर्कशॉपचे आधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. डासांमुळे मलेरिया, डेंगी व चिकुनगुनिया हे आजार होतात. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील नागरिक त्रस्त आहेत. डास निर्मुलनाबाबत मुंबई महापालिकेने राबलिल्या अभियानाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका अभियान राबविणार आहे.
महापालिकेने गतवर्षी डास निर्मुलन समिती स्थापन केली आहे. समितीच्या शिफारशीनुसार डास निर्मुलनासाठी शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. शहरात व घरोघरी जाऊन डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याबाबत जागृती केली जाणार आहे. स्वच्छ पाणी जमा होत असलेल्या खड्डे नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाण्याचा तळे व डबक्यात गप्पी मासाच्या पैदास केली जाईल. या अभियानासंदर्भातील माहिती महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी दिली. वैद्यकीय व आरोग्य विभागामार्फत वर्षभर डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारावर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली.