वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी पोलीस-नगरसेवक यांची बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pcmc-maharashtra-police.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – शहरातील वाढती गुन्हेगारी, अत्याचार, खून, महिलांची असुरक्षितता यावर पोलिसांसोबत चर्चा करून शहराला भेडसावणारे प्रश्न मांडण्यासाठी शुक्रवारी (दि. 12) पोलिस आयुक्तांसोबत बैठक आयोजित केली आहे. ही बैठक ऑटो क्लस्टर येथे होणार आहे, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी सांगितली.
कासारसाई येथील अत्याचार व मुलीची हत्या आणि पिंपरीतील एचए मैदानावर सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने दोघींना श्रध्दांजली वाहून कायदा आणि सुव्यवस्थेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेमध्ये पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मुली, महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मुलींना घराबाहेर पाठवणे चिंताजणक बनले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्यक्ष पोलिसांसोबत चर्चा करण्यात यावी, त्यासाठी पोलिसांसोबत बैठक आयोजित करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरूवारी (दि. 27) महासभेमध्ये केली होती.
त्यावर शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अत्याचार, बेशिस्त वाहतूक या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्यासोबत पत्रव्यवहार करून त्यांची वेळ घेतली आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीला भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.