अजित पवारांचे शिलेदार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची शरद पवारां सोबत भेट
अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता
पुणे : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यातच आता अनेक पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरु झाले आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे शिलेदार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार गटाला लवकरच सोडचिठ्ठी?
शरद पवार आज उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचे शिलेदार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्ताने मोठी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असे लिहिण्यात आले आहे. यावर अतुल बेनके, शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा फोटो पाहायला मिळत आहे. मात्र या बॅनरवर अजित पवारांचा फोटो दिसत नाही. यामुळे अतुल बेनके हे लवकरच अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोललं जात आहे.
त्यातच जुन्नर तालुक्यादरम्यान अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. जुन्नर तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ही भेट झाली. यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अतुल बेनके यांनी सलग दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतल्याने जुन्नरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. तसेच सध्या शरद पवार आणि अतुल बेनके यांची भेट ही चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रशांत परिचारक यांचे विश्वासू नागेश भोसलेही पवार गटाच्या वाटेवर
तर दुसरीकडे पंढरपुरातील माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे विश्वासू समर्थक नागेश भोसले यांनी घेतली जयंत पाटलांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागेश भोसले बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. नागेश भोसले हे माझी नगराध्यक्ष साधना भोसले यांचे पती आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी माजी नगराध्यक्ष साधना भोसले या इच्छुक आहेत. त्यामुळे साधना भोसले आणि नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी उमेदवारी मागितली. नागेश भोसले यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागेश भोसले यांनी बंड केल्यास प्रशांत परिचारक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.





