शहरातील टपरी-पथारी-हातगाडी धारकांचा महापालिकेवर ‘धडक मोर्चा’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200211-WA0118.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांचे सर्वेक्षण करावे, अतिक्रमण कारवाई थांबवावी, पक्या गाळ्यात पुनर्वसन करावे. हॉकर्स झोन निर्माण करावे, नवीन व्यक्तीला लायसन देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता पिंपरी-चिंचवड महापालिकेवर हातगाडी- पथारीवाल्यांनी मोर्चा काढला.
टपरी-पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सचिन प्रल्हाद कांबळे, शहराध्यक्ष रमेश शिंदे, जिल्हाध्यक्ष मल्हार काळे, पुणे शहर अध्यक्ष राजू पोटे, अरुण भोसले, विलास थोरात, गणेश आहेर, यास्मिन शेख, पद्मिनी पंडित, रंजना धोडवल, राजमीन खान, काशीनाथ रसाळ, मोहन भिसे, अर्जुन सुरवसे, सद्धाम खान, अभिमान साबळे, युनुस शेख आदींची प्रमख उपस्थिती होती.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २००७ मध्ये टपरी-पथारी हातगाडीधारकांसाठी कायदा केला. याला पंधरा वर्ष होत आहेत. परंतु, अजून एकही हॉकर्स झोन शहरात झाले नाही. याबाबतचे धोरण कागदावरच राहिले. याची लवकरात लवकर अंमलबजावनी करून हातगाडी- टपरी- पथारीवाल्यांचे पुनर्वसन करा. अन्यथा या लहरी कारभाराविरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा कांबळे यांनी दिला.