शहरातील अवैध गुटखा विक्री रोखण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ‘आक्रमक’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200211-WA0004.jpg)
- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची घेतली भेट
- गुटखा विक्रीच्या विरोधात पोलीस यंत्रणा सज्ज करण्याची केली मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध गुटखा वाहतूक व विक्री संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त बिष्णोई यांना निवेदन देखील दिले आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच गुटख्याच्या अवैध वाहतुकीला चाप बसवण्यासंदर्भात मंत्रालयात एक विशेष बैठक घेतली. गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, विक्रेते आणि गुटखा कंपन्यांच्या मालकांवर तसेच सूत्रधारांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर गुटखा प्रतिबंधीत खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक आढळून आल्यास तेथील अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे विक्री होणा-या गुटख्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, नगरसेवक हिरानंद असवानी, कार्याध्यक्ष उमेश काटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अक्षय शेडगे, आकाश मोरे, सुरज निंबाळकर, तेजस सिंग, परीक्षित कुलकर्णी, प्रसाद शेगडे, दामोदर बोऱ्हाडे आदींच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेतली. छुप्या मार्गाने विक्री होणा-या गुटख्याला कायमचा आळा घालण्यासंदर्भात पोलीस यंत्रणा राबवून मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली.
तसेच, बैठकीत प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहरात येणारा गुटखा रोखण्यासाठी शहराच्या सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच गुटखा विक्री संदर्भात कारवाई करण्यात येऊन विक्रेत्यांवर जरब बसवावा. शहरामध्ये शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात सर्रास गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावासारखे पदार्थांची विक्री केली जाते. यामुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.
गुटखा विक्री रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा
अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महानगरपालिका आणि पोलीस यांच्या बरोबर एक संयुक्त बैठक आयोजीत करून गुटखा विक्री संदर्भात ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, असा आग्रह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने धरला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुटखा वाहतूक व विक्रीचा पूर्णपणे बिमोड होईल. याबतीत सर्वच पोलीस निरीक्षकांना आपापल्या विभागात कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. या बाबतीत योग्य ती कारवाई न झाल्यास विद्यार्थी आणि समाजाच्या हितासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.