‘व्हीप’ बजावूनही शिवसेनेत दोन गट, महापाैर निवडणूकीवेळी महा’शिव’ आघाडीत फाटाफूट !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/DSC_8046-scaled.jpg)
महापाैर निवडणूकीत शिवसेनेच्या 9 पैकी 6 नगरसेवकांचे राष्ट्रवादी उमेदवाराला पाठिंबा
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापाैर पदाच्या निवडणुकीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी काॅंग्रेस असा सामना रंगला. या निवडणुकीत शिवसेनेच्या 9 पैकी 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवित मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसला मतदान करण्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसून आले. शिवसेनेने सर्व नगरसेवकाना व्हीप बजावूनही तिघांनी महापाैर निवडीवेळी गैरहजर राहून व्हीपचे पालन केले नाही. यावरुन राज्यात महा’शिव’आघाडीचे सत्तेत येत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये महा’शिव’आघाडी एकोपा होण्यास अडथळा झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापाैर – उपमहापाैर निवडणुक आज (शुक्रवार) यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी पीठासिन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तंनू गोयल यांनी कामकाज पाहिले. निवडणुक कामकाजात दोन्ही उमेदवाराचे अर्ज छाननीत वैध ठरले. त्यानंतर दोन्ही उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास पंधरा मिनिटाचा कालावधी दिला. उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
या निवडणुकीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी एकत्रित येवून मतदान केले. यामध्ये भाजप महापाैर पदाच्या उमेदवार स्वाती ऊर्फ माई ढोरे यांना 81 तर राष्ट्रवादी काॅंग्रेस उमेदवार माई काटे यांना 41 मते पडली. त्यामुळे महापाैर निवडणुकीत माई ढोरे या 40 मतांनी विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना एकत्रित महाशिवआाघाडीचे सरकार स्थापन होवू घातले आहे. त्याच घडामोडीवरुन राज्यातील महापाैर-उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत पडसाद पडले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेने यांनी भाजपला रोखण्यास संख्याबळाच्या आधारे एकत्रित एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे. परंतू, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महापाैर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पक्षाच्या नगरसेवकांना व्हीप बजावून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महापाैर पदाच्या उमेदवारांना पाठिंबा देवून मतदान केले. त्यात नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे, नगरसेविका आश्विनी चिंचवडे हे गैरहजर राहिल्याने शिवसेनेत गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले.
मनसे, राष्ट्रवादी, अपक्ष नगरसेवक गैरहजर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापाैर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले हे गैरहजर राहिले. त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार मतदान न करण्याचा निर्णय घेतला. तसेच अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनुराधा गोफणे हे तिघे जण गैरहजर होते.