विरोधी पक्षनेत्यांचा भोसरी आमदारांच्या जाहिरातीवर आक्षेप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/2MaheshLandge_DattaSane_19j19_final.jpg)
- महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, स्थायी सभापतींना दिले पत्र
- भोसरीत भरती हवाई दलाची, खर्च महानगरपालिकेचा अन्ं जाहिरात आमदारांची
भोसरी ( महा ई न्यूज ) – भोसरीच्या गावजत्रा मैदानावर हवाई दलाची भरती आयोजित केली आहे. त्या भरतीचा खर्च महानगरपालिकेच्या तिजोरीत करण्यात येत आहे. मात्र, त्या सर्व भरती कार्यक्रमाची प्रसिध्दी भोसरीचे आमदार महेश लांडगे घेत आहेत. त्यांना खरचं बेरोजगार युवकांसाठी काही करायचे असेल, तर वैयक्तीक खर्च करुन स्वताः जाहिराती प्रसिध्दी कराव्यात, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रहिताच्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या खर्चावर जाहिरातीची पोळी भाजून घेणे हे आमदारांना शोभत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृहासमोरील गावजत्रा मैदानावर 21 ते 29 जुलैला हवाई दलाची भरती अभियान आयोजित केले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रहिताचा असल्याने महापालिकेमार्फत मदत म्हणून मांडव विद्युत व्यवस्था तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करण्याकरीता सुमारे 50 लाख 2 हजार 244 रुपये करण्यात येणार आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, हा कार्यक्रम राष्ट्रहिताचा असून स्थानिकांबरोबर राज्यभरातील बेरोजगारांना हवाई दलात संधी मिळणार आहे. त्यावर महापालिकेकडून खर्च करण्यास माझी काहीच हरकत नाही. परंतु, या कार्यक्रमाचे श्रेय भोसरीचे आमदार महेश लांडगे घेत आहेत. ते जाहिराती फ्लेक्स, फेसबूक, व्हॉटस अॅपसह इतर सोशल मीडिया माध्यमांवर स्वताःच्या जाहिराती फिरवत आहेत. त्यावर कुठेही महापालिकेचा उल्लेख नाही.
आमदारांना एवढीच जर मिरविण्याची हौस असेल. तर, त्यांनी हा सर्व खर्च वैयक्तीकरित्या करुन जाहिराती कराव्यात. आम्हाला त्याबद्दल आक्षेप असणार नाही. परंतु, महापालिकेच्या खर्चावर स्वत:च्या जाहिरातीची पोळी भाजून घेणे, तेही राष्ट्रहितासारख्या कार्यक्रमात हे आमदारांना शोभत नाही, असे साने यांनी म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या ठिकाणी दर्शनी भागावर हा कार्यक्रम महापालिकेच्या आर्थिक सहाय्यातून होत आहे. अशा आशयासह महापालिकेच्या बोधचिन्हासह ठळक अक्षरात फलक लावण्याची मागणी साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.