विद्यमान नगरसेवकांबरोबरच माजी महापौर आणि माजी नगरसेवकांना आरोग्य विम्याचे ‘कवच’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/pcmc-1.jpg)
- उपसूचनेसह विषयाला महापौरांनी दिली मंजुरी
- माजी महापौर मंगला कदम यांच्या सूचनेचा समावेश
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या विद्यमान नगरसेवकांबरोबरच माजी नगरसेवक आणि माजी महापौर यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. वार्षीक पाच लाख रुपये रक्कमेचा आरोग्य विमा लागू होणार आहे. त्यामध्ये नगरसेवक, महापौर यांच्या कुटुंबिंयाना या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र, या योजनेत माजी नगरसेवकांचा समावेश नव्हता. नगरसेवकांच्या मागणीनंतर या योजनेत माजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला असून या विषयाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये आरोग्य विमा योजना लागू आहे. त्यामध्ये माजी महापौरांचा समावेश करण्यासाठीचा विषय गुरूवारी (दि. 20) सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या विषयाला मंजुरी देत असताना माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या की, आरोग्य विमा योजनेत माजी महापौरांचा समावेश करण्यात येत आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये माजी नगरसेवकांना देखील समाविष्ट करावे. ज्यांना या योजनेचा उपयोग घेणे उचीत वाटेल, ते लाभ घेतील. यापूर्वीही माजी नगरसेवकांचे कागदपत्र आणि फॉर्म्स भरून घेतले आहेत. त्याचे अद्याप काहीही झालेले नाही. या योजनेचा माजी नगरसेवकांना व त्यांच्या कुटुंबियांना देखील उपयोग झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर महापौर राहूल जाधव यांनी माजी महापौर कदम यांची सूचना मान्य करत उपसूचनेसह या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे या आरोग्य विमा योजनेचा लाभ आता विद्यमान नगरसेवकांबरोबरच माजी महापौर आणि माजी नगरसेवकांना देखील मिळणार आहे.