विजेचा धक्का बसून शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यू

पिंपरी (महा ई न्यूज ) – इंदोरी जवळील पिंजणमळा येथील अमराईच्या संरक्षण तारेमध्ये सोडलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसून एका शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यु झाला.
पिंकी बापू केदारी (वय ११ रा.इंदोरी ,ठाकरवस्ती) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आदिवासी ठाकर समाजातील मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री इंदोरी परिसरात वादळी पाऊस पडला. अमराईच्या कुंपणाजवळील आंबे वेचण्यासाठी पिंकी केदारी व तिची दोन भावंडे इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते. तेथील संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता. याची पुसटशी कल्पनाही पिंकीला नव्हती. विजेचा तीव्र धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला.पिंकी केदारी ही इंदोरी येथील जिल्हा परिषद् प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होती.ती हुशार व गुणी मुलगी होती. आंबे संरक्षित करण्याच्या उद्देशाने सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका बलिकेचा बळी गेला आहे.
दरम्यान, याबाबत सविस्तर चौकशी करून या प्रकरणातील दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी दिली.





