‘वायसीएम’ च्या ‘पी.जी. इन्स्टिट्यूट’साठी ‘एमसीआय’चा ग्रीन सिग्नल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/ht-pune_2a4594b0-ab89-11e7-696x447.jpg)
– यंदा ‘कान-नाक-घसा’ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होणार
विकास शिंदे
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आर्युविज्ञान परिषदेने आज (बुधवारी) ग्रीन सिग्नल दिला. त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर वायसीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव प्रसिध्द झाले असून त्यांच्या परवानगीचे पत्रही मिळाले आहे. त्यामुळे यंदा वायसीएममध्ये कान-नाक-घसा या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी तीन जागा भरण्यास येणार आहेत, त्यामुळे राज्यात महापालिकेने सुरु केलेले पहिले वैद्यकीय महाविद्यालय ठरणार आहे, अशी माहिती वैद्यकीय विभागातील सुत्रांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही कार्यान्वित आहे. या अभ्यासक्रमांकरिता आवश्यक १० प्राध्यापक, १६ सहयोगी प्राध्यापक, २७ सहायक प्राध्यापक अशी एकूण ५३ पदे भरण्यात आली आहेत. पदव्युत्तर संस्थेकरिता नेमणूक केलेल्या पदांना ऑगस्ट आणि नोव्हेंबर २०१७च्या वेतन संरचनेनुसार मानधन निश्चित केले होते.
या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार सात विभागासाठी आवश्यक अध्यापकवर्ग उपलब्ध केला आहे. वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्था सुरू करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार भारतीय आर्युविज्ञान परिषदेने वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्था सुरु करायला परवानगी दिली. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वायसीएम पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे नाव प्रसिध्द केले.
वायसीएममध्ये स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिरोग, कान-नाक-घसा, पॅथॉलॉजी, बालरोग, भूलशास्त्र आणि मनोविकृती चिकित्सा या सात विषयांचे अभ्यासक्रम असणार आहेत. त्यापैकी सध्या कान-नाक-घसा या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली. अजूनही पंधरा दिवसात तीन-चार विषयांना देखील मान्यता मिळणार आहे. वायसीएमला हे पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरु करण्यास आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.