वाकड – पिंपळे निलख मधील विकासकामांना गती; प्रभागातील विकासकामांचा नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांनी घेतला आढावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201031-WA0011.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
वाकड – पिंपळे निलख परिसरात मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या चालू विकासकामांचा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व प्रभागाच्या नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांनी पाहणी दौरा करून नागरिकांना होणाऱ्या समस्या, सद्यस्थितीत कामांची स्थिती याबाबत माहिती घेतली. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनामुळेच वाकड – पिंपळे निलख मधील विकासकामांचा गती मिळाली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कावेरी सब-वे ते शौर्य हॉटेल चौक रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे व वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करणे आदी कामांचा यात समावेश आहे. सध्या वाकड-पिंपळे निलख प्रभागात २०० कोटींच्या वर विकासकामे चालू आहेत. ही सर्व कामे ममता विनायक गायकवाड स्थायी समितीच्या अध्यक्षा असताना त्यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेली आहेत. आता हि सर्व विकासकामे प्रगतीपथावर असून लवकरच विकसित प्रभाग म्हणून हा प्रभाग नावारूपाला येतील.
ममता विनायक गायकवाड म्हणाल्या कि “आज वाकड परिसरात २०० कोटींच्या वर विकासकामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व विकासकामे स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाच्या काळात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस पाठपुरावा करून मंजूर करण्यात आलेली होती. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भातील सूचना देखील संबंधित विभागास देण्यात आलेल्या होत्या. त्याअनुषंगाने आजचा पाहणी दौरा करण्यात आला. हि कामे चालू असताना नागरिकांना छोट्या-मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत. त्या अनुषंगाने ठेकेदारास आज सूचना देण्यात आल्या. आम्ही जे निवडणुकीच्या काळात नागरिकांना विकासकामांबाबत जो ‘शब्द’ दिलेला होता, तो आज पूर्ण होताना दिसत आहे. त्याबद्दल मनस्वी समाधान वाटत आहे. या परिसरातील नागरिकांना लवकरच हि सर्व विकासकामे पाहायला व अनुभवायला मिळतील आणि पिंपरी चिंचवड शहरात एक विकसित प्रभाग म्हणून हा परिसर ओळखला जाईल.”