वाकड, कस्पटे वस्ती : छत्रपती चौकात वाहतूक कोंडी, नागरिक हैराण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Mauli-Kaspate.jpg)
- कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांच्याकडून वाकड पोलिसांना निवेदन
- कोंडी फोडण्यासाठी चौकात सिग्नल बसविण्याची केली मागणी
पिंपरी, (महाईन्यूज) – वाकड येथील कस्पटे वस्तीच्या छत्रपती चौकात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी चौकात सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे यांनी केली आहे.
- यासंदर्भात ज्ञानेश्वर कस्पटे यांनी वाकड वाहतूक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा नोकरदार वर्ग वाकड आणि लगतच्या भागात वास्तव्य करतो. त्यांना काळेवाडी फाटा या मार्गाने हिंजवडीला जावे लागते. तर, त्याच मार्गाने सायंकाळी परत यावे लागते. कस्पटे वस्तीत राहणा-या नागरिकांना देखील या मार्गाने वहिवाट करावी लागते. वाहनांची संख्या वाढल्यामुळे कस्पटे वस्ती येथील छत्रपती चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या असतात. त्यातच वाहतूक पोलीस वेळेवर येत नसल्यामुळे कोंडी फोडणे अशक्य होऊन बसले आहे. जरी कोंडी फोडता अली तरी रस्त्याच्या दुतर्फा असलेले भाजी विक्रेते, फळ विक्रेते, पाणीपुरी हातगाड्यांची संख्या वाढल्यामुळे पादचा-यांच्या नाकी नऊ आले आहे. येथील वाहनांची कोंडी फोडण्यासाठी चौकात सिग्नची व्यवस्था कार्यान्वीत करावी. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागून कोंडी फोडण्यास मदत होईल, अशी मागणी कस्पटे यांनी पोलिसांना केली आहे.