वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Vitthal-Kubde.jpg)
पिंपरी :- पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. राष्ट्रपती कार्यालयाकडून आज संपूर्ण देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिका-यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांचे नाव आहे.
विठ्ठल कुबडे यांनी 1994 ते 2000 दरम्यान गोंदिया येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना ब-याच गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण केला. त्यांच्या या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून राष्ट्रपती पदकासाठी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव केला जातो. पोलीस महासंचालक याबाबतचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवतात, त्यानंतर राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठवितात. अधिका-यांनी केलेल्या कामगिरीच्या समीक्षेनंतर राष्ट्रपती पदकांची यादी जाहिर करण्यात येते. पदक वितरण सोहळ्याची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. लवकरच ही तारीख जाहीर होणार आहे.
विठ्ठल कुबडे म्हणाले, “पोलीस खात्यात काम करत असताना अनेक जबाबदाऱ्या सांभाळत काम करावे लागते. अनेकदा जीवघेण्या प्रसंगांना देखील सामोरं जावं लागतं. पण अशा पदकांमधून जेंव्हा कामाचा गौरव होतो, तेंव्हा काम करण्याची उर्मी आणखीन वाढते. माझ्या आजवरच्या कामगिरीत माझ्या सहका-यांचे देखील योगदान आहे. त्यामुळे हा सन्मान माझ्यासह माझ्या सर्व सहका-यांचा देखील आहे”