वंचित आघाडीला सत्ता द्या, कंपन्याचे खासगीकरण थांबवून कामगारांना नोकरीत कायम करु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/20190128_201841.jpg)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची एचए मैदानावर गजरली तोफ
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आजपर्यंतच्या सत्ताधा-यांनी कामगारांना किमान वेतन दिलेच नाही. 17 हजार 500 एवढे वेतन असताना त्यांना केवळ 8 हजार रुपये दिले जातात. वरचे पैसे खिशात घातले जात आहेत. ही कामगारांची मोठी लूट आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही लूट थांबविल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच कंपन्याचे खासगीकरण थांबवून कामगारांना कायमस्वरुपी नोकरी देवू, असेही त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या अवधीवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठीच बहुजन वंचित आघाडीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आज पिंपरीतील एचए मैदानावर वंचित आघाडीची सभा होत आहे. या सभेत आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच विद्यमान सत्ताधारी भाजप सरकरावर घाणाघात केला.
आंबेडकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये 80 झोपडपट्ट्या आहेत. त्याला कधी एसआरए लागतो माहित नाही. मुंबईतील झोपडपट्ट्या उठवून बिल्डरांच्या घशात घातल्या. सरकारी साखर कारखाने मोडून त्याठिकाणी खासगी कारखाने सुरू केले. याचे गमक काय आहे. हे त्यांनी सांगावे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे खाजगीकरण बंद केलं जाईल. काँट्रॅक्टवरचा कामगार परमनंट केलं जाईल. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगारांच्या नावाने 30 हजार कोटी रुपये एका कामगाराला दिले जातात. पण, हा ठेकेदार त्या कामगाराला 8 हजार रुपये देतोय. किमान वेतन सुध्दा देत नसल्याचे वास्तव आहे. शहरातल्या कामगाराला 17 हजार 500 किमान वेतन आहे. इथं बसलेली माणसे कामगाराला 8 हजार रुपये देतात. कामगारांना लुटले जाते. ही लूट थांबविल्याशिवाय राहणार नाही.