लोणावळ्यात घातक हत्यारांसह एकाला अटक; ग्रामीण एलसीबीची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/img-20201023-wa0011_202010509172.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
वर्धमान सोसायटी लोणावळा येथील गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथे छापा मारत पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने एका व्यक्तीला दोन गावठी पिस्टल, एक काडतुस, एक लोखंडी कोयता व रेम्बो चाकूसह ताब्यात घेतल्याने लोणावळा शहरात खळबळ माजली आहे.
पुणे ग्रामीण एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज विजय अगरवाल (वय 40, रा. कल्पतरु हाॅस्पिटल समोर, वर्धमान सोसायटी लोणावळा) असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुणे ग्रामीणच्या एलसीबी टिमला गुप्त खबर मिळाली होती की, लोणावळ्यातील सुरज अगरवाल ह्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व काही बेकायदेशीर हत्यारे आहेत. त्या अनुषंगाने सापळा लावत गुरुवारी गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथे सुरज याला ताब्यात घेत अंग झडती घेतली असता त्यांच्या कंबरेला एक पिस्टल व मँग्झिनमध्ये एक जिवंत काडतुस मिळून आले. तसेच त्याच्या गोडऊन मध्ये एका रूमच्या बाहेर चार कप्पे असलेले लोखंडी रॅकची पाहणी केली असता आणखीन एक गावठी कट्टा तसेच कोयता व रेम्बो चाकू मिळून आला असल्याचे घनवट यांनी सांगितले. सदरचे विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेले 2 गावठी पिस्टल 1 जिवंत काडतुस, लोखंडी कोयता, रँबो चाकू असा एकुण 1लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सुनील जावळे, प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, लियाकत मुजावर, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अगरवाल याला पुढील तपासणीसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.