रेशन दुकानदारांना वितरणाचा दर 200 रुपये प्रति क्विंटल द्यावा – मा. खासदार गजानन बाबर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/ration.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
केंद्रशासित दिल्ली सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने रेशनिंग दुकानदारांना धान्य वितरणाचा दर 200 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात बाबर यांनीऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, देशात तसेच राज्यात कोरोना साथीने अक्षरशः थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना धान्य वितरण करण्याचे काम रास्त भाव रेशनिंग दुकानदार करत आहेत. दिल्लीसारख्या केंद्रशासित राज्यांमध्ये तेथील सरकार संदर्भ 28/ 2 /2019 च्या परिपत्रकाद्वारे गहू, साखर व तांदूळ या धान्यावर प्रति क्विंटल 200 रुपये कमिशन देत असून आपले सरकार प्रति क्विंटल 150 रुपये मात्र देत आहे.
आपल्या सरकारद्वारे देण्यात येणारे कमिशन हे खूप तुटपुंजे आहे. यावर फेरविचार करणे गरजेचे आहे. सध्या सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. आपल्या सरकारद्वारे तसेच आपल्या विभागाद्वारे रास्त भाव रेशनिंग दुकानदार यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दोनशे रुपये प्रति क्विंटल हा दर देण्यात यावा. जेणेकरून रास्त भाव रेशनिंग दुकानदार आपला उदरनिर्वाह योग्य प्रकारे करू शकतील. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. या वाढत्या महागाई बरोबर रास्त भाव रेशनिंग दुकानदार यांच्याकडेही पाहणे गरजेचे आहे. तरी, आपण यावर योग्य विचार करून लवकरात लवकर ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून दरवाढ द्यावी, अशी मागणी बाबर यांनी निवेदनात केली आहे.