रिक्षा संघटनांच्या राज्यव्यापी संपाला रिक्षा पंचायतचा विरोध – बाबा आढाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/1.jpg)
पुणे – राज्यातील काही रिक्षा संघटनांनी अचानक नऊ जुलै रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला रिक्षा पंचायतीच्या वतीने विरोध करण्यात आला. त्याकरिता रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव स्वतः भर पावसात रस्त्यावर उतरले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे बाबा आढाव यांनी निदर्शने करून उद्याच्या (ता.९) संपाला विरोध दर्शवला. तसेच विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याचबरोबर थर्ड पार्टी इन्शुरन्सचा हप्ता कमी करा ओला उबेरवर कारवाई करा, खुला परवाना बंद करा अशा मागण्या देखील त्यांनी यावेळी केल्या.
प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी रिक्षा पंचायतीने उद्याच्या संपात सहभाग न घेतल्यामुळे बाबा आढाव यांचे आभार मानले. दरम्यान राज्यातील विविध रिक्षा संघटना आपल्या मागण्यांसाठी 9 जुलै रोजी पुकारलेल्या एकदिवसीय संपात फूट पडली असून, राज्यभरातील 37 संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. मात्र संयुक्त रिक्षा चालक कृती समिती या संपावर ठाम असून, ठाणे वगळता राज्यभर रिक्षा बंद राहतील, असा दावा समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला.
संयुक्त रिक्षाचालक कृती समिती आणि या समितीला आव्हान देणार्या प्रतिस्पर्धी संघटना क्रांती रिक्षा, टॅक्सी संयुक्त समिती महाराष्ट्र या संपात सहभागी नसल्याचे समितीचे महाराष्ट्र प्रभारी कासम मुलाणी यांनी दै. पुढारीला सांगितले.