रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
रिक्षाचालक-मालकांच्या मागण्यांसाठी उद्या सकाळी अकरा वाजता शहरातील सर्वच रिक्षा स्टॅंडवर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय रिक्षा चालक-मालकांनी घेतला आहे. सर्व रिक्षा चालका-मालकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्षा बाबा कांबळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बाबासाहेब ढवळे, विजय ढगारे, सचिन कदम, संतोष पवार, संतोष उबाळे, सचिन कांबळे, निलेश वाघुले, संतोष मस्के, अजय साळवे, नासिर बिराजदार, वाजिद शेख, प्रवीण ठोके, विकी चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनामुळे दिवसेंदिवस रिक्षाचालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर होत असून व्यवसाय नसल्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. बिकट परिस्थितीमध्ये रिक्षाचालकांना सरकारच्या वतीने आर्थिक मदत होणे गरजेचे, केंद्र सरकारने वीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जरी जाहिर केले. परंतु, रिक्षा टॅक्सी आणि वाहक यांना कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नाही. जसे महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली तसेच रिक्षाचालकांच्या हप्ते व कर्ज माफ करावी, अशी मागणी आहे. कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपण्यांकडून तगादा लावला जात आहे. कर्जमाफीऐवजी वसुली केली जात आहे. याबाबत कारवाई करावी, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आदि रिक्षाचालकांच्या मागण्या असून या मांडण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, गेल्या सात महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद असून रिक्षाचालकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालक हाल सहन करत असून त्यांचे जीवन हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. रिक्षाचालकांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकारने आतापर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढत असून लवकरात लवकर सरकारने मदत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.