राष्ट्रवादीतर्फे सेल्फी वीथ खड्डा उपक्रम हाती, फोटोसह खड्डा दाखविणा-याला शंभर रुपये बक्षीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/ncp_logo.jpg)
पिंपरी – शहरात एकही खड्डा नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाने केल्याचा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी खड्ड्यांचे सेल्फी वीथ खड्डा उपक्रम हाती घेतला आहे. प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक खड्डा दाखवेल त्याला शंभर रुपये बक्षिस दिले जाणार आहे, अशी माहिती दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. 17) दिली.
दत्ता साने म्हणाले, शहरात मागील तीन महिन्यांपासून डांबरीकरणाची कामे करण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील या रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचा शहरवासियांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. भाजपच्या भ्रष्टाचारयुक्त कारभारातून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून ते पिंपरी-चिंचवडकरांच्या जिवीताशी खेळत आहेत.
शहरात खड्डेच खड्डे असताना केवळ 349 खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर, तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण शहर खड्डे मुक्त झाल्याचा अजब खुलासा दस्तुरखुद्द शहरअभियंते आंबादास चव्हाण यांनी केला होता. सर्वत्र खड्डेच खड्डे असताना असे उत्तर देऊन शहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. यासाठी शहरातील रस्त्यावर जेवढे खड्डे आहेत. त्या खड्यांचे सेल्फी विथ खड्डा, हा उपक्रम सुरू केला आहे. खड्यांसोबतच सेल्फी काढून खड्यांचे ठिकाण, स्वत:चे नाव व मोबाईल नंबर टाकून तो फोटो विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या ‘माझा सेल्फी विथ खड्डा’ या फेसबुक पेजला टॅग करावा. अथवा साने यांच्या (9822199599) आणि युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या (9970037513) या व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटो पाठविणा-याला प्रत्येक खड्ड्याला 100 रुपये दिले जाणार आहेत.