राष्ट्रवादीच्या विरोधकांनी डोळ्यावरचा ‘चष्मा बदलावा’; माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे यांना टोला
पिंपरी, (मह-ई-न्यूज) – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला की, त्यामध्ये काळेबेरे केल्याचा संशय विरोधकांचा वाढत चालला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी त्यांची नजर बदलण्याची गरज आहे. त्यांनी घातलेला चष्मा जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत समोरचं जग रंगीतच दिसणार, अशा शेलक्या शब्दांत भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधकांना टोला लगावला.
चिखलीत होणा-या संतपीठाच्या समितीवर स्थानिक राजकीय व्यक्तीचा समावेश करण्यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केले. संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत 31 कोटींची अफरातफर होत असल्याचा भाजपच्या नेत्यांवर ठपका देखील ठेवला. त्यातच संतपीठ समितीमध्ये येड्या-गबाळ्याची नेमणूक करू नका, संत साहित्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तींचीच समितीमध्ये नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यावर पालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधकांच्या आरोपाला आज प्रत्युत्तर दिले आहे.
पवार म्हणाले की, संतपीठ समितीत पाच सदस्यांनी निवड केली आहे. अजून पंधरा सदस्य निवडले जाणार आहेत. समितीमध्ये संतसाहित्याचा अभ्यास, सांप्रदायीकतेचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचीच निवड होणार आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने हेच केवळ चिखलीचे नगरसेवक आहेत, आणि समितीमध्ये त्यांचा समावेश केला नाही, म्हणून भाजपवर आरोप करण्याची निती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडावी. मी आणि महापौर राहूल जाधव आम्ही दोघे चिखलीचेच नगरसेवक आहोत. आमच्यासह आमदार महेश लांडगे यांचा देखील संतपीठ समितीमध्ये समावेश नाही. आणि होणारही नाही. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करणे विरोधकांनी सोडावे. संतपीठाच्या कामामध्ये राजकारण आणू नये. प्रत्येक कामात त्यांना भाजप काही तरी काळेबेरे करत असल्याचा संशय येत आहे. आता त्यांना नजरा बदलण्याची गरज आहे. दिर्घकाळ एकाच चष्म्यातून बघितल्यानंतर संपूर्ण जग हे रंगीतच दिसणार, यात शंका नाही, अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना शालूत घालून लगावला.