रस्त्याच्या कडेवर कचरा टाकणा-या व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रुपीनगर-तळवडे येथील टेक्सटाईल व्यावसायात निर्माण होणारा कचरा व्यावसायिकाकडून रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी स्थळावर जाऊन कचरा भरून आणलेले वाहन ताब्यात घेतले. व्यावसायिकावर पालिकेच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावर कचरा टाकून शहर सौंदर्यास बाधा पोहोचविणा-या व्यक्ती, संस्था, कंपन्या अथवा व्यावसायिकांवर कारवाईचे सत्र हाती घेतले आहे. रस्त्याच्या कडेवर कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, शहराचे सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे ही कारवाई अधिक तिव्र करण्यात आली आहे.
पालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यहद्दीत प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर-तळवडे येथील निघोजे पुलाजवळ कचरा टाकण्यासाठी टेक्सटाईलचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाकडून मोटारीत (एमएच 12, क्युजी 3052) कचरा आणला जात होता. याची माहिती प्राप्त होताच आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. आरोग्य अधिकारी डी. जे. शिर्के, मुख्य आरोग्य निरीक्षक ज. जे. गायकवाड, आरोग्य निरीक्षक सतिश पाटील यांच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन संबंधित वाहन ताब्यात घेतले. व्यवसायिक सागर चंद्रप्रकाश भाटिया यांना याप्रकरणात 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.