रखडलेले महापौर निवास बांधून दाखविणारच; महापौर जाधव यांचा निर्धार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/20180926_173241.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – आजपर्यंत गेली कित्येक महापौरांचा कार्यकाळ संपून गेला. मात्र, निगडी प्राधिकरणातील महापौर निवास बांधण्याचा प्रश्न काही केल्या कोणाला सोडविता आलेला नाही. मात्र, यावर्षी कसल्याही परिस्थितीत महापौर निवास बांधून दाखवणारच आहे. त्यासाठी 2019-20 च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्याची सूचना प्रशासनाला करणार असल्याचे महापौर राहूल जाधव यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांना त्यांच्या कार्यकाळात त्यांना राहण्यासाठी निगडी प्राधिकरणातील भूखंड महापौर निवासकरिता राखीव आहे. ही जागा पालिकेच्या ताब्यात आहे. मात्र, आजपर्यंत त्याठिकाणी महापौर निवास बांधण्यात आले नाही. राष्ट्रवादीने सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगली. त्यांच्या कार्यकाळात देखील याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला. आता भाजपची सत्ता असल्याने महापौर राहूल जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत माझ्या कार्यकाळामध्ये महापौर निवास बांधणार म्हणजे बांधणारच, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
असा आत्मविश्वास गतवर्षातील महापौर नितीन काळजे यांनी देखील व्यक्त केला होता. त्यांचा कार्यकाळ संपून गेला. मात्र, त्यांना महापौर निवास करता आले नाही. काळजे यांच्यासारख्या आजपर्यंतच्या अनेक माजी महापौरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये महापौर निवासचा प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन दिले होते. मात्र, ते आमलात आले नाही. आता विद्यमान महापौर राहूल जाधव यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.