breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…म्हणून मी तोलून-मापून बोलतो, महेश दादांचे माध्यमांवर “खापर”

  • भाजपच्या वक्तव्यखोर आमदारांचे समर्थन
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मांडली भूमिका

अमोल शित्रे

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदारांच्या बेताल वक्तव्यामुळे पक्षश्रेष्टींपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून ते घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्यापर्यंत अशा अनेक आमदारांची जीभ घसरल्याने पक्षाला राजकीय गालबोट लागले. अशा आमदारांच्या बेताल वक्तव्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांना सुध्दा प्रतिक्रीया देता आली नाही. मात्र, माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांमुळे पक्षाच्या आमदारांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागले असल्याचे खापर प्रसार माध्यमांवर फोडून भाजपच्या वक्तव्यखोर आमदारांचे महेश दादांनी एकप्रकारे समर्थनच केले आहे. सांगवीतील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात महेश दादांनी आपली भूमीका मांडली आहे. तसेच, अलिकडे मी तोलून मापूनच बोलतो, उलट बोलण्याअगोदर चुकलेच तर माफ करण्याची विनंती देखील करतो, अशी कबुली आमदार महेश लांडगे यांनी मोठ्या मनाने दिली आहे.

 

आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत बेताल वक्तव्य केले होते. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. भोसे (ता. पंढरपूर) येथील सभेत त्यांनी सैनिकांच्या संदर्भात अवमानकारक आणि हिन पातळीवरील उदाहरण दिल्याने त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला गेला. दरम्यान, परिचारक यांनी झालेल्या प्रकाराविषयी जाहीर माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला. त्यातच, पुण्यातील एका शाळेच्या कार्यक्रमात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांची देखील बोलताना जीभ गसरल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यातच उदगीरचे भाजप आमदार सुधाकर भालेराव यांनी देखील स्वजातीविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. जातीतील व्यक्तींची किंमत 500 रुपये करून “साडेसाती”अशी उपमा दिली होती. त्यावर लातूर येथील लहुजी शक्ती युवा सनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत लातूरात आंदोलन छेडले होते.

 

नुकत्याच झालेल्या दहीहंडी सोहळ्यात उत्साहाच्या भरात घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याचे विधान करून संकटाला कवटाळले. उभ्या महाराष्ट्रातून त्यांच्यावर छी-थू झाली. त्यांच्याविरोधात राज्यभर शाब्दीक अवडंबर माजल्याने ट्वीटर या माध्यमातून माफी मागण्याचा सोपस्कार त्यांनी केला. त्यानंतर तो मजकूर डिलीट करण्याचा उद्योग देखील कदमांनी केला. एकूनच भाजप आमदारांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे पक्षाची पुर्ती नाचक्की होत आहे. त्यामुळे राज्यातल्या भाजप व भाजप प्रणीत आमदारांनी आता ताकही फुकून पिण्यास सुरूवात केली आहे. कोणत्याही कार्यक्रमात तोलून-मापून बोलण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. उत्साहाच्या भरात एखादे विधान करताना संकटात सापडू की काय? असा भितीयुक्त प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. तोंडून भलतेच विधान गेल्यानंतर माफी मागत बसण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच माफी मागण्याचा मार्ग काहींनी स्वीकारला आहे. त्याचा प्रत्यय गुरूवारी (दि. 20) सांगवीतील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहातील आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आला.

 

मराठवाड्यातील जनतेशी लांडगे परिवाराचे ऋणानुबंध

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सोहळा सांगवीतील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहात गुरूवारी सायंकाळी आयोजित केला होता. कार्यक्रमात आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाला संबोधित करताना महेश दादा म्हणाले की, मराठवाड्यातील सर्वाधीक लोकसंख्या भोसरी मतदार संघामध्ये आहे. त्यांच्यासोबत लांडगे परिवाराचे ऋणानुबंध स्व. अंकुशराव लांडगे यांच्या कार्यकाळापासूनचे आहेत. या जनतेला लांडगे परिवार कदापी विसरणार नाही. “बोलता खूप येतं, पण त्याचा विपर्यास केला जातो”. त्यामुळे “टीव्हीवर चुकीच्या पध्दतीने प्रमोट केले जाते”. अलिकडे “उत्साहाच्या भरात बोलणं खूप कठीण झालं आहे”. बोलण्याची “इच्छा नसताना देखील बोलता-बोलता एखादा शब्द अनावधानाने गेल्यास मोठी अडचण निर्माण होते”. म्हणून “मी अलिकडे तोलून-मापूनच बोलतो”. विशेषतः “बोलण्यापूर्वीच तोंडून अनावधानाने चुकीचा उच्चार झाल्यास माफ करण्याची विनंती देखील करत असतो”, अशा शब्दांत महेश दादांनी मनाचा मोठेपणा व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button