मोशीत इस्टेट एजंटकडून सात गावठी पिस्तूल हस्तगत
पिंपरी – मोशी परिसरात गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सात गावठी पिस्तुले व २८ काडतूसे हस्तगत केली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानी ही कामगिरी केली.
योगेश बाजीराव दौंडकर (वय ३५, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड, जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काळ्या रंगाच्या दुचाकीवर एकजण मोशी परिसरात पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित व्यक्तीला सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. तसेच त्याच्या जवळ असलेल्या दुचाकींची तपासणी केली असता डिकीमध्येही लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेले एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आली. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने विक्री करता आणलेली आणखी पाच पिस्तुले चांदुस कोरेगाव (ता. खेड) येथील फार्महाऊसमधून हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी आरोपी दौंडकर यांच्याकडून एकूण सात पिस्तुले व २८ काडतुसे असा एकूण दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, संजय गवारे, किरण आरोटे, संदीप ठाकरे, चेतन मुंडे, मयूर वाडकर, राजाभाऊ बारशिंगे, मोहम्मद गौस नदाफ यांचा पथकाने ही कामगिरी केली.