मे. स्पर्श हॉस्पीटलच्या बिलाबाबत डॉ. रॉय यांच्याकडून आयुक्तांची दिशाभूल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pcmc-1-9.jpg)
- नकारात्मक टिपण्णी जोडून आयुक्तांसमोर फाईल केली सादर
- अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी फोडले पितळ
पिंपरी / महाईन्यूज
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड 19 काळात कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांवर उपचार करणा-या भोसरीतील मे. स्पर्श हॉस्पीटल यांना मंजूर दराच्या 65 टक्के बिल काढण्यात आले. मात्र, अतिरिक्त आयुक्त अजित पवार रजेवर असल्याचे दाखवून आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी आकसबुध्दीने बिल अदा करण्याबाबत नकारात्मक टिपण्णी तयार करून त्यावर लिपीकाची बळजबरीने स्वाक्षरी घेतली. अतिरिक्त आयुक्त पवार यांच्या परस्पर सदरचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापुढे ठेवला. चुकीचा प्रस्ताव सादर करून डॉ. रॉय यांनी आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर रॉय यांचा खोडसाळपणा उघडकीस आला आहे.
मार्च 2020 मध्ये कोविड 19 संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या विचारात घेता बाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी 10 हजार बेड्सची सोय करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पालिकेची रुग्णालये अपुरी पडणार असल्याने बेड्सची उपलब्धता वाढविण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंजरेस्ट (ईओआय) द्वारे आपात्कालीन परिस्थितीत अल्प निविदा प्रसिध्द करून डॉक्टर्स, स्टाफ व इतर मनुष्यबळ वापरण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ए, बी, सी, अशा तीन कॅटेगरीमध्ये निविदा मागविण्यात आल्या. ए कॅटेगरीमध्ये मे. स्पर्श हॉस्पीटलला आरोग्य विभाग, अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी मान्यता दिली. त्यांना 90 दिवसांसाठी कामकाज सुरू करण्याचे लेखी आदेश दिले. त्यापोटी त्यांना 80 टक्के पर्यंत पेमेंट अदा करण्याची हमी ईओआयमध्ये देण्यात आली होती. त्यानुसार 12 ऑगस्ट 2020 रोजी त्यांच्याशी करार करण्यात आला.
या कोविड सेंटरला 90 दिवसांसाठी पालिकेने रुग्ण पुरवायचे ठरले होते. परंतु, ऑक्टोबर 2020 पासून कोविड पेशंटची संख्या कमी होत गेली. त्यामुळे स्पर्श कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून देखील त्यांना पालिकेकडून रुग्ण पाठविणे शक्य झाले नाही. दरम्यान बाधितांचा अंदाज घेऊन काही कोविड सेंटर बंद करण्यात आली. तथापि, इतर कोविड सेंटर्ससोबत 90 दिवसांचा करार करण्यात आला होता. ठरल्याप्रमाने त्यांना 80 टक्के बिल अदा करणे क्रमप्राप्त होते. हे बिल जास्तीचे होत असल्यामुळे त्यांना 65 टक्केच बिल अदा करण्याचे धोरण ठरविण्यात आले. परंतु, स्थायी समितीपुढे कोविड सेंटर्सनी ईओआयनुसार 80 टक्केच पेमेंट अदा करण्यात यावे, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर समितीच्या तीन ते चार बैठका घेऊन 40 टक्के, 50 टक्के करत संस्थाचालकांना 65 टक्के बिल अदा करण्याचा अंतिम निर्णय झाला. त्यामध्ये 180 रुपये जेवनाचे व 100 रुपये मेडीसीन व इतर साहित्याचे असे एकूण 280 रुपये कमी करण्याचे धोरण ठरले. याउपर आम्ही कोर्टात जाणार नाही, असे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आले.
त्यानुसार त्यांना 90 दिवसांसाठी 6 कोटी 58 लाख 26 हजार रुपये पेमेंट देय होते. त्यापैकी मे. स्पर्श हॉस्पीटल यांनी 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची मागणी केली. समितीच्या अहवालानुसार मे. स्पर्श हॉस्पीटल यांच्या एकूण बिलातून 280 रुपये वजा करून उर्वरीत 3 कोटी 29 लाख 40 हजार एवढे पेमेंट अदा करण्यात आले. त्यामुळे पालिकेची 1 कोटी 97 लाख 20 हजार 800 रुपयांची बचत झाली. त्यावर 8 फेब्रुवारी 2021 नुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत जे पत्र लिहिले, त्याबाबत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शहानिशा केली. त्यावर ते पत्र वस्तुस्थितीस धरून नसल्याचे समोर आले. पत्र काढणारे आरोग्य विभागातील मुख्य लिपिक ढोरे यांना नोटीस पाठवून त्याचा खुलासा मागितला. त्यामध्ये ढोरे यांना कोवीड केअर सेंटरबाबत कसलीही माहिती नसल्याचे समोर आले. मुख्य लिपिक साबळे रजेवर गेल्यामुळे रॉय यांनी त्यांच्याजागी ढोरे यांना बोलावून बळजबरीने त्यांची स्वाक्षरी घेतल्याचे उघडकीस आले. त्याची मुळ टिपण्णी बाजुला ठेवून एक वेगळी स्वतंत्र टिपण्णी बनवून ती आयुक्त हर्डीकर यांच्यापुढे ठेवली. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त पवार हे रजेवर गेल्याचे दाखविण्यात आले. मात्र, आयुक्त हर्डीकर यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यावर रॉय यांचे कोविड केअर सेंटर्सचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
————————-
डॉ. रॉय यांचा खोडसाळपणा उघडकीस
मुख्य लिपिक ढोरे हे अन्य विभागात कार्यरत आहेत. आरोग्य विभागातील लिपीक साबळे रजेवर गेल्यामुळे रॉय यांनी ढोरे यांना बोलावून घेतले. दिशाभूल करणारा प्रस्ताव तयार करून त्यावर त्यांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली. हे सर्व खोडसाळपणाने केल्याचा खुलासा लिपिक ढोरे यांनी केला आहे. यामध्ये डॉ. रॉय देषी आढळून आले आहेत. यात डॉ. अमोल होळकुंड यांची चूक नसताना चुकीची बिले काढणे, पालिकेची फसवणूक करणे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे मत रॉय यांचे वैयक्तीक आहे. यात मी सहभागी नसल्याचे ढोरे यांच्या खुलाशात समोर आले आहेत. यामध्ये डॉ. रॉय दोषी असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका लवकरच घेतली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.