मेट्रोच्या पोलवर वारकरी संप्रदायाची छायाचित्रे रेखाटावीत, आमदार जगतापांची मागणी
पिंपरी, (महाईन्यूज) – तीर्थक्षेत्र आळंदी-देहु -पंढरपूर वारीकरिता जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गावरील मेट्रो पोलवर वारकरी संप्रदायाची छायाचित्रे रेखाटण्यात यावीत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.
याबाबत पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील तीर्थक्षेत्र आळंदी-देहु येथून जगदगुरु श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात दरवर्षी पाच लाखांहून अधिक वारकरी पंढरपूरपर्यंत पायी वारी करीत असतात. पालखी सोहळ्यादरम्यान महाराष्ट्रातून भाविकांची रेलचेल चालू असते.
या पायी वारीत आळंदी, देहु येथील महात्म्य जर भाविकांनी छायाचित्रांच्या माध्यमांतून कळण्यासाठी मेट्रो पोलवर वारकरी संप्रदायाबाबतची छायाचित्रे रेखाटावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. मेट्रो पोलवर संत साहित्याचे रेखाचित्रे रेखाटली, तर पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात भर पडेल.
पंढरीच्या वारीचा हा अनुभव भक्तांना स्वर्गसुख देणारा असतो. पुरोगामी विचारांचा समाज घडविण्यासाठी संताचे विचार आणि छायाचित्रे वारीच्या मार्गावर साकारली, तर पुरोगामी समाज व राज्य घडविण्यास मदत होईल. संत साहित्य संमेलनातून हा वारसा पुढे नेण्याचे काम छायाचित्रांतून होईल. तरी तीर्थक्षेत्र आळंदी-देहु-पंढरपूर वारीकरिता जाणा-या वारक-यांच्या सोयीसाठी आणि समाज प्रबोधनासाठी वारकरी संप्रदायाची छायाचित्रे पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो पोलवर रेखाटावीत, अशी मागणी आमदार जगताप यांनी निवेदनात केली आहे.