मिळकतकर वाढीचा चेंडू महासभेपुढे; स्थायी समितीकडून शिफारस
![मिळकतकर वाढीचा चेंडू महासभेपुढे; स्थायी समितीकडून शिफारस](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/pcmc-2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
महापालिका कार्यक्षेत्रातील मिळकती आणि इतर अनुषंगिक बाबींवर आकारण्यात येणा-या कर आणि करेत्तर बाबींचे दर मागील वर्षीप्रमाणे सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरीता कायम ठेवण्यात आले असून या दर निश्चितीच्या विषयास स्थायी समितीने आज मान्यता दिली. अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्यात येणार असून तशी शिफारस स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
सामान्य करामध्ये १२ हजार रुपयांपर्यंतच्या करयोग्य मुल्यावर निवासी मिळकतीकरीता १३ टक्के तर निवासेतर मिळकतींवर १४ टक्के दर असणार आहे. १२ हजारापुढील ३० हजार रुपयांच्या करयोग्य मुल्यावर निवासी १६ टक्के तर निवासेतर १७ टक्के दर असणार आहे. ३० हजारांपुढील करयोग्य मुल्यावर निवासी आणि निवासेतरसाठी २४ टक्के दर असणार आहे. तसेच इतर वेगवेगळ्या करांच्या दरामध्ये देखील बदल केलेला नसून ते दर मागील वर्षा इतकेच असणार आहे. या करामध्ये साफसफाई, अग्निशामक, मनपा शिक्षण, मलप्रवाह सुविधा लाभ, पाणीपुरवठा लाभ, रस्ता, विशेष साफसफाई आणि वृक्षकराचा समावेश आहे.
नाट्यगृह कर तथा करमणूक करामध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ५०० पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त बैठक व्यवस्था असणा-या थिएटरला प्रती स्क्रीन २५० रुपये करमणूक कर आकारला जाणार आहे. मराठी सिनेमांसाठी करमाफी देण्यात आली आहे. वातानुकुलित थिएटरसाठी प्रती स्क्रीन ३५० रुपये आकारले जाणार आहेत. तर नाटक, सर्कस, तमाशा, संगीत जलसे, शास्त्रीय संगीत जलशांसाठी प्रती प्रयोगास १०० रुपये कर आकारण्यात येणार आहे. कुस्त्या आणि मुष्टीयुध्दाच्या प्रती प्रयोगास ५० रुपये कर आकारला जाणार आहे. याखेरीज वेगवेगळे खेळ नसणा-या इतर प्रत्येक प्रयोगाच्या प्रत्येक दिवसासाठी १०० रुपये कर आकारला जाणार आहे.
तसेच सामान्य करातील सवलत योजनांसाठीचे दर देखील निश्चित करण्यात आले आहे. सामान्य कर, साफसफाई कर, अग्निशामक कर आणि मनपा उपशिक्षण कर यांचा समावेश असलेल्या सामान्य कराच्या रकमेत सूट देण्यात आली आहे. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची पत्नी यांच्या स्वत: रहात असलेल्या फक्त एका निवासी घरास आकारण्यात येणा-या सामान्य कर रकमेच्या ५० टक्के रक्कम सूट देण्यात येणार आहे. अशीच सूट फक्त महिलांच्या नावे असलेल्या, स्वत: रहात असलेल्या फक्त एका निवासी घरास तसेच ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणा-या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर आणि मुकबधिर यांच्या नावावर असणा-या मिळकतीसदेखील सामान्य कर रकमेच्या ५० टक्के रक्कम सूट देण्यात येणार आहे.
तसेच संपूर्ण मिळकतकराची रक्कम आगाऊ भरणा-यांकरीता सामान्य करात सुट देणे, ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र प्राप्त असणा-या मिळकतींना त्या त्या रेंटीग प्रमाणे सामान्य करात सुट देणे, संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवा तसेच अविवाहीत शहीद सैनिकांच्या नामनिर्देशितांचे राहणा-या त्याचप्रमाणे शहरात वास्तव्य करणा-या माजी सैनिकांना शासन निर्णयानुसार मालमत्ता करातून सूट देणे, थकबाकीसह एक रक्कमी मिळकतकराचा भरणा ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे करणा-या मिळकत धारकास चालू आर्थिक वर्षाचे सामान्य करात सवलत देण्याच्या प्रस्तावित दर निश्चितेला स्थायी समितीने मान्यता दिली.
तसेच मिळकत हस्तांतरण नोंद नोटीस फी करयोग्य मूल्यावर ५ टक्के, थकबाकी नसल्याचा दाखला फी प्रती दाखला १० रुपये, मिळकत प्रती उतारा २० रुपये आणि प्रशासकीय सेवाशुल्क प्रती बिलास १० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.