मित्राचा दगडाने ठेचून खून : दापोडीतील घटना; तिघा आरोपींना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/3-9.jpg)
दापोडी येथे दारू पिताना किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये भांडण झाले. त्यात मोबाईल फोन घेतला म्हणून तिघांनी मिळून मित्राचाच दगडाने ठेचून खून केला. ही घटना गुरुवारी (दि.१८) दुपारी हॅरिस ब्रिजखाली दापोडी येथे घडली. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
मिलिंद चंद्रकांत आल्हाट (वय २४), अनिकेत उर्फ डुल्या राजेंद्र गायकवाड (वय २९), आशिष दयानंद कोल्हे (वय २१, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय शशिकांत सूर्यवंशी (वय २५, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन सयाजी शिंदे (वय ३८, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत अजय हे एकमेकांचे मित्र होते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता ते दापोडी येथे हॅरिस ब्रिजखाली दारू प्यायला बसले. दारू पिण्याचा त्यांचा कार्यक्रम सव्वा पाच वाजेपर्यंत चालला.
दरम्यान, मृत अजय याने अनिकेत गायकवाड याचा मोबाईल फोन घेतला. या कारणावरून तिघा आरोपींनी अजयला दगडावर डोके आपटून तसेच दगडाने ठेचून ठार मारले. खून केल्यानंतर अजयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह फरफटत मुळा नदीच्या पात्रात नेऊन टाकला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. पोलिसांनी अजयचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर गेले होते. काही वेळेतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.