माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणा-या पाच जणांच्या टोळीला अटक

पिंपरी |महाईन्यूज|
म्हाळुंगे परिसरात माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी घेताना पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे माथाडी संघटनामध्ये खळबळ उडाली आहे.
अजय शंकर कौदरे (वय 39), प्रदीप रामचंद्र सोनावणे (वय 32, दोघेही रा. मु. पो. खारोशी, ता. खेड, जि. पुणे), गणेश दशरथ सोनावणे (वय 33, रा. कुरूळी, ता. खेड, जि. पुणे), स्वप्नील अजिनाथ पवार (वय 29, रा. एकतानगर, चाकण) आणि धोंडिबा ऊर्फ हनुमंत विनायक वडजे (वय 32, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
20 ते 23 तारखेला दरम्यान काही जणांनी एका कंपनीत येऊन धमकी दिली की, कंपनी चालवायची असेल तर वेदांत एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीच्या एका प्रतिनिधीला कामावर घ्या, तो कामावर येणार नाही. मात्र त्याचा पगार व इतर देणी असे मिळून दरमहा 20 हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमची विकेट काढेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधींनी म्हाळुंगे पोलीस चौकीत तक्रार दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या निर्देशानुसार व पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून 20 हजारांची खंडणी घेताना माथाडी संघटनेचा अध्यक्ष अजय कौदरे, प्रदीप सोनावणे आणि गणेश सोनावणे या तिघांना जागेवरच अटक केली. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्वप्नील पवार आणि धोंडिबा वडजे या दोघांनाही अटक केली.
धमकावून खंडणी मागणा-यांची तक्रार करा
म्हाळुंगे परिसरातील उद्योजक आता तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. अटक केलेल्या आरोपींनी किंवा इतर कोणत्याही टोळीकडून आणखी कोणाला धमकावून खंडणी घेत असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी निर्धास्तपणे पुढे यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केले आहे.





