माणसाचे जीवन एका श्वासापुरते मर्यादित!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/hande-maharaj.jpg)
- ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे : काळेवाडी येथे हरिनाम सप्ताह
पिंपरी – माणसाचे जीवन केवळ एका श्वासापुरते मर्यादित आहे. सोडलेला श्वासही आपला नसतो, त्यामुळे अहंकार बाळगू नका. वाहने, दागदागिने, पैसा आणि संपत्ती याचा काहीही उपयोग नसतो, असे मत वाकडकर शिवभूषण हभप रोहिदास महाराज हांडे यांनी व्यक्त केले.
अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त गुरुवार दि. 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताहातील तिसऱ्या दिवसाचे कीर्तन हभप हांडेमहाराज यांनी सादर केले.
संत तुकाराम महाराज यांचा लाडकी न करी रे संग, राहिरे निश्चला,लागो निधी भळ ममतेचा’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले. सप्ताहाचे मुख्य आयोजन महापालिकेच्या ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवकबाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, संतोष कोकणे, बजरंग नढे, नरेश खुळे, सखाराम नखाते, विजय काळे, शरद नखाते, लहू कोकणे, काळुराम काळे आदी या वेळी उपस्थित होते. पांडुरंग महाराज काळे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
शिवभूषण हभप रोहिदास महाराज हांडे या वेळी म्हणाले की, आपण कोणाला सुख देऊ शकलो नाही तरी चालेल, मात्र आपल्यामुळे दुस-याला दु:ख होता कामा नये. शरीर कितीही सुंदर असले तरी ते नाशवंत आहे. आत्म्यावर प्रेम करा, प्रत्येकाशी माणुसकीने वागा. तत्व आणि सत्वाची बैठक करा. राष्ट्र आणि धर्माविरोधात बोलू नका.