महासभेच्या ठराव क्रमांक 499 ची तातडीने अंमलबजावणी करा
- प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या पदोन्नतीचा ठराव क्रमांक 499 ची तातडीने अंमलबजावणी करून त्यांना पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना व इतर कल्याणकारी योजना राबविल्या जातात. पिंपरी-चिंचवडमध्ये अपंग बांधवांची संख्या जास्त असल्यामुळे अपंग कल्याणकारी योजना राबविण्यास या विभागाकडून विलंब होत आहे. अपंग कल्याण विभाग हा नागरवस्ती विकास योजना विभागातून स्वतंत्र करण्यात यावा. त्याद्वारे अपंग कल्याणकारी योजना राबविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा. अशी मागणी गेली कित्येक वर्षापासून केली जात आहे. अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 मध्ये सुध्दा अपंग कल्याण विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याबाबत स्पष्ट आदेश आहेत.
याचा विचार करता पालिकेच्या 20 जानेवारी 2020 रोजीच्या आमसभेत विषय क्रमांक 4 नुसार ठराव क्रमांक 499 अन्वये समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती देऊन त्यांच्याकडे अपंग कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात यावी. असा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. परंतु, या ठरावाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबतचे स्पष्टीकरण आयुक्तांनी आठ दिवसांत द्यावे, अशी मागणी आंदोलनचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केली आहे. हे निवेदन राज्यमंत्री बच्चू कडू आणि राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तालयात पाठविण्यात आले आहे.





