महापौर साहेब जरा नगरसेवकांचाही सन्मान ठेवा राव, सभागृहात संताप
- नगरसेवकांनी महापौरांवर व्यक्त केली नाराजी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांनी शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाचा विषय जबदरस्तीने मंजुर केला. विशेष म्हणजे या विषयाला विरोधकांचा आक्षेप असताना त्यांनी सभागृहातील एकाही नगरसेवकाला आपले मत मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी महापौरांवर संताप व्यक्त केला. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडल्याने महापौर राहूल जाधव यांनी नगरसेवकांना एकेरी शब्दप्रयोग केल्याने नगरसेवकांचा संताप अनावर झाला. महापौर आम्ही तुम्हाला सन्माननिय महापौर असे म्हणतो, नगरसेवकांचाही जरा सन्मान ठेवा राव, अशी भावना शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी व्यक्त केली.
शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाच्या विषयावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, या विषयात 8 ते 10 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. भाजपच्या नेत्यांचे हात भृष्टाचाराने बरबटले आहेत. या विषयाला आमचा विरोध असताना घाईघाईत विषयाला मंजुरी देण्याची हिम्मत कशी काय केली, असे म्हणत त्यांनी महापौर जाधव यांना टार्गेट केले. त्यावर सभागृहातील राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक उठून महापौरांच्या समोर आले. सभागृह कामकाज बंद पाडल्याने महापौर जाधव यांना चीड असह्य झाली. त्यांनी एकेरी शब्दांत नगरसेवकांना बस की आता, शांत बस ना, उठ.. असा एकेरी शब्दप्रयोग केल्याने नगरसेवकही चिढले.
त्यांनी महापौरांना भर सभेत सन्मानाचे ढोस पाजले. ज्याअर्थी आम्ही सन्माननिय महापौर आपणाला म्हणतो, तर तुम्ही देखील आम्हाला सन्मानार्थ वागणूक दिली पाहिजे, जरा नगरसेवकांचाही सन्मान ठेवा राव, असे म्हणत कलाटे यांनी पुढील विषयाला हात घातला. महापौर दादागिरी करून विषय रेटून नेत असल्याचा आरोप माजी महापौर मंगला कदम यांनी केला.