‘मुख्यमंत्री येऊ दे नाहीतर कोणीही येऊ दे कसब्यात बदल होणार’; अजित पवार

आमचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचंड मताने विजयी होणार
पुणे : कसबा पोटनिवडुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते मंडळी तळ ठोकून बसले आहे. यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री येऊ दे..नाहीतर कोणीही येऊ दे..कसब्यात बदल होणार, असं म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आज विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री येऊ की कोणीही येऊ त्यांना प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. आम्हाला महाविकास आघाडीकडून आवाहन करण्याचा अधिकार आहे. जनतेला बदल हवा आहे आणि हा बदल निश्चितपणे होणार, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाने काल जो निर्णय दिला आहे त्या निर्णयामुळे शिवसेना मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राग आहे. याचा परिणाम उद्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कसबा मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होणार आहे. आमचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचंड मताने विजयी होणार आहेत, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.





