महापाैरांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना मारले फाट्यावर; आदेश डावलून घेतल्या उपसूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/6-14.jpg)
सभागृहात उपसूचना न वाचताच मंजूरी, पण नगरसचिवांना सापडेनात
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजप महापाैर उषा ढोरे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. महासभेत एकही उपसूचना नगरसेवकांनी द्यायची नाही आणि महापाैरांनी घ्यायची नाही, अशा सुचना करुनही आज (बुधवारी) झालेल्या महासभेत सहा उपसूचना स्विकारुन त्या गोंधळात मंजूर करण्यात आल्या. त्यात अधिका-यांना पदोन्नतीसह अन्य आर्थिक विषयाचे प्रस्ताव दिल्या गेल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. महापालिकेच्या महासभेत सतत देण्यात येणा-या उपसूचना कोणत्याही विषयाच्या असतात. त्यामुळे महासभेत उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही, असे सांगूनही प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला महापाैर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी केराची टोपली दाखविली आहे.
दरम्यान, महापालिकेत हद्दीतील इमारतींना कर योग्य मूल्य वाढीच्या प्रस्तावावरुन महासभेत गोंधळ झाला. या गोंधळातच भाजपने कामकाज चुकीच्या पध्दतीने चालवित तीन मिनिटांत 18 विषयांना मान्यता दिली. वाचा… मंजूर, वाचा… मंजूर जणू असा सपाटा लावला होता. तसेच सभागृहातील गोंधळाचा फायदा घेत उपसूचना देखील स्विकारल्या आहेत. पाच विषयांना सहा उपसूचना दिल्या आहेत. या उपसुचनांचे कोणीही वाचन केलेले नाही. त्याला अनुमोदन दिलेले नाही. तरीही त्या महापाैरांनी मंजूर केल्या. सत्ताधा-यांनी प्रदेशाध्यक्षांचाच आदेश डावल्याने आता प्रदेशाध्यक्ष पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.