महापालिकेने ‘युवा धोरण’ आणावे, भाजप नगरसेवकांची महापौरांकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190720-WA0015.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – बेरोजगार व सुशिक्षित युवकांची पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी संख्या आहे. या नवयुवकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी त्यांना भेडसावणा-या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी महापालिकेने दूरदृष्टी असणारे ‘युवा धोरण’ निश्चित करावे, अशी मागणी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महापौर राहुल जाधव यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या ‘युवा धोरणात’ शिक्षण, क्रिडा, संस्कृती, रोजगार आदी क्षेत्रांचा विशेष अभ्यास करुन त्यांचा समावेश करण्यात यावा. यातून शहरातील युवक व विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळू शकतात. यावेळी महापौरांनी ‘युवा धोरण’ आणण्यासंदर्भात योग्य ते आदेश देऊ, असे आश्वासन दिले.
महापौर राहूल जाधव यांच्याशी चर्चा करताना नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे सरचिटणीस दिपक नागरगोजे, प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडे, प्रविण सिंग, अमोल दामले, राहुल शिंदे, दिपक शर्मा, नागनाथ गुट्टे, मच्छिंद्र गिते, अक्षय निकम, अविनाश काळे, संदिप इंडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.