महापालिकेच्या कचरा संकलन करणा-या ठेकेदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
![Nine people, including a municipal waste collection contractor, have been charged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pcmc-2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी खाजगी जागेतील कचरा भरला. त्यातून पालिकेकडून लाखो रुपयांची बिले वसूल केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा गोळा करणारी एजन्सी, तिचे प्रोजेक्ट हेड, सुपरवायझरसह नऊ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शशिकांत शिवाजी मोरे (वय 37) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एजी इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा ली. (पत्ता. 14 वा माळा, देव कोपरा, कॅडबरी जंक्शन, ठाणे पश्चिम), वाहन चालक रुपेश भागुजी जगताप (वय 44, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), वाहन चालक गणेश तुकाराम अर्जुने (वय 32, रा. पडवळनगर, थेरगाव), वाहन चालक आशुतोष लुईस मकासरे (वय 28, रा. रहाटणी), कचरा वेचक आरिफ मेहबूब मकाशी (वय 22, रा. थेरगाव), रोहित भाऊसाहेब सरवदे (वय 21, रा. चिंचवड स्टेशन), संतोष बिभीषण कांबळे (वय 30, रा. रिव्हर रोड, पिंपरी), एजी इन्व्हायरो कंपनीचा सुपरवायजर प्रतीक तावरे (वय 26, रा. मारुंजी, हिंजवडी), प्रोजेक्ट हेड तानाजी पवार (रा. मोशी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट एजी इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. ली. या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीची तीन कचरा वेचक वाहने वाकड परिसरात फिरतात. जेवढा जास्त कचरा गोळा केला जाईल, तेवढे जास्त पैसे कंपनीला मिळणार आहेत. त्यामुळे कंपनीचा फायदा करून देण्यासाठी आरोपींनी कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी खाजगी जागेतील कचरा भरला. त्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आणि शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली. याबाबत भारतीय दंड विधान कलम 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.